ऑनलाइन लोकमतधर्मशाला, दि. 28 - धर्मशाला कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या रहाणेने आपल्या पहिल्याच कसोटीत विजय संपादन करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी विश्वात भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची अजिंक्य रहाणेची ही पहिलीच वेळ होती. संघाचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत विजय मिळवणारा रहाणे नववा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी ही किमया गांगुली सचिन, धोनीसारख्या महान खेळाडूंनी केली आहे.
पॉल उम्रीगर , सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांच्या रांगेत रहाणेने स्थान मिळवले आहे. तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीनंतर विराट कोहलीने धर्मशाला कसोटीतून माघार घेतली होती. धरमशाला कसोटीत भारताने आठ विकेटने कांगारुंचा पराभव करत विजयाची गुढी उभारली आहे.
मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.