गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात आज मराठमोळ्या कुस्तीची पताका उंचावली. महाराष्ट्रातील कुस्तीपटू राहुल आवारे याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशीवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे भारताचे कुस्तीमधील पहिले आणि एकूण 13 वे सुवर्णपदक आहे.
पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानी मल्ल मोहम्मद बिलाल याचा पराभव करत अंतिम फेरीत मुसंडी मारणाऱ्या राहुल आवारेने अंतिम फेरीतही धडाकेबाज खेळ केला. एकतर्फी झालेल्या या लढतीत राहुलने सुरुवातीलाच दोन गुणांची कमाई करत झोकात सुरुवात केली. मात्र ताकाहाशीने सलग चार गुणांची कमाई करत लढतीत पुनरागमन केले. पण राहुलने पुन्हा एकदा सामन्यावर नियंत्रण मिळवताना कॅनेडियन कुस्तीपटूची चहुबाजूंनी कोंडी करत आघाडी मिळवली.
त्यानंतर राहुलच्या पकडीतून सुटणे ताकाहाशीसाठी अवघड बनले. पण लढतीवर राहुलचे पूर्ण वर्चस्व असतानाचा त्याला किरकोळ दुखापत झाल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पण या दुखापतीतून सावरत राहुलने लढतीवर अखेरपर्यंत नियंत्रण राखले आणि 15-7 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.