ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 30 - माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत अ आणि 19 वर्षांखाली संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार आहे. द्रविडला पदावर कायम ठेवण्याच निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. 2015 साली राहुल द्रविडची भारत अ आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून भारताच्या या दोन्ही संघांनी घरच्या आणि परदेशातील मैदानांवर दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान, प्रशिक्षकपदी पुनर्निवड झाल्यानंतर द्रविडने आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या मेंटॉरपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
2015 साली द्रविडने प्रशिक्षकपद सांभाळल्यावर भारत अ संघाने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत विजय मिळवला होता. त्या मालिकेत भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे तुल्यबळ संघ सहभागी झाले होते. तसेच 19 वर्षांखालील संघानेही द्रविडच्या मार्गदर्शानाखाली चांगली कामगिरी केली. 2016 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
द्रविडच्या पुनर्निवडीबाबत बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून द्रविडने युवा खेळाडूंना सोबत घेऊन खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे. महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे द्रविडचा प्रशिक्षकपदावरील कार्यकाळ अजून दोन वर्षांनी वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाचा भारतीय क्रिकेटला फायदा होईल अशी मला आशा आहे.