नवी दिल्ली : दोन वर्षांनी होणाऱ्या २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर त्याचा कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय योग्य आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे. कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा धोनीचा निर्णय आश्चर्यकारक नव्हता, असे सांगून राहुल द्रविड पुढे म्हणाला, ‘पुढच्या विश्वचषकात धोनी कर्णधार म्हणून स्वत:ला पाहात नसेल तर त्याचा निर्णय योग्य आहे. विराट कोहलीकडे संघाची सूत्रे देण्यासाठी ही चांगली वेळ असून, त्यालाही वर्ल्डकपसाठी मनासारखी संघबांधणी करता येईल.’धोनीचा अनुभव आणि क्षमतेला अजिबात तोड नाही. दडपणात खेळण्याची धोनीची क्षमता आहे, हे सर्वश्रुत आहे. असे खेळाडू आणि कर्णधार सहजासहजी मिळत नाहीत. धोनी भारतीय वन-डे संघासाठी अमूल्य खेळाडू आहे; पण कामगिरीच्या बळावरच तुम्हाला संघात तुमचे स्थान निश्चित करता येते, असे द्रविडने नमूद केले.मोठ्या स्पर्धांपूर्वी धोनीचा फॉर्म हा चर्चेचा मुद्दा बनू शकतो. धोनीचे खेळणे त्याची कामगिरी आणि क्षमतेवर विसंबून असेल. संघात त्याचे स्थान यष्टिरक्षण तसेच फलंदाजी यासाठीच असेल. अनुभव आणि खेळाचे ज्ञान असल्याने धोनी चांगल्या कामगिरीद्वारे संघात कायम राहावा, असे कोहलीलासुद्धा वाटत असावे. क्रिकेट इतिहासात धोनी हा भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून सदैव स्मरणात राहील. या खेळाला आणि भारतीय संघाला सातत्याने पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणारा अफलातून कर्णधार या नात्याने धोनीची तुलना करणे कठीण असल्याचे मत द्रविडने शेवटी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
...तर धोनीचा निर्णय योग्यच : राहुल द्रविड
By admin | Published: January 07, 2017 4:37 AM