ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २० - के. एल. राहुलने शानदार शतक (१०५) झळकावल्याने आणि रोहित शर्मा (७९) व विराट कोहली (७८) यांच्या अर्धशतकी खेऴीमुळे भारताची स्थिती मजबूत झाली असून भारताने दिवसअखेर ८७.२ षटकात ३१९ धावा केल्या आहेत. के. एल राहुलचे हे कारकिर्दीतील दुसरे शतक आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताचे मुरली विजय (०) व अजिंक्य रहाणे (४) हे दोन महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची स्थिती २ बाद २० अशी बिकट होती. मात्र विराट कोहली आणि के. एल. राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. कोहली ७८ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या जोडीला आलेला स्टुअर्ट बिन्नीही लवकर बाद झाला. स्टुअर्ट बिन्नीने दहा धावा केल्या. त्यानंतर आलेला रिधिमान साहा आणि रोहित शर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित शर्माच ७९ धावांवर बाद झाला. रिधिमान साहा १९ धावांवर नाबाद राहिला आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-० अशा पिछाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान आज भारतीय संघात काही बदल करण्यात आले असून शिखर धवन, हरभजन सिंग व वरूण अॅरॉनऐवजी मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी व उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.