विशाखपट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अनुभवी गौतम गंभीरचे स्थान धोक्यात आले आहे.इंग्लंडच्या वेगवान व स्विंग माऱ्याविरुद्ध पहिल्या कसोटीत गौतम गंभीरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत राजस्थानविरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलला सिनिअर राष्ट्रीय निवड समितीने पाचारण केले. कुंबळे म्हणाले,‘दुसऱ्या कसोटीला अद्याप दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राहुल निवडीसाठी उपलब्ध होता. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश राहणार असल्याचे निश्चित असल्यामुळेच त्याला पाचारण करण्यात आले आहे. कानपूर लढतीदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. तो दुखापतीतून सावरला असून प्रोटोकॉलनुसार त्याने रणजी लढतीत खेळत फिटनेस सिद्ध केला आहे. रणजी लढतीत त्याने पहिल्या डावात ७६ तर दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी तो फिट झाल्यामुळे आनंद झाला असून निवडीसाठी उपलब्ध असणे समाधानाची बाब आहे.’इंग्लंड संघात जिम्मी अँडरसनच्या पुनरागमनाच्या शक्यतेबाबत विचारले असता कुंबळे म्हणाले की, आम्ही कुणा एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत नाही. अँडरसनने ४५० बळी घेतले असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. तो यापूर्वीही येथे खेळलेला आहे. इंग्लंडसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तुम्हाला अनुभवाची गरज आहे आणि अशा खेळाडूच्या समावेशामुळे संघ मजबूत होतो. आम्ही इंग्लंडचा संघ म्हणून विचार करतो. कुणा एका विशिष्ट खेळाडूवर लक्ष केंद्रित करीत नाही.’ कुंबळे यांनी उमेश यादव व मोहम्मद शमी यांची प्रशंसा करताना सांगितले की, ‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. शमी व उमेश यांनी अचूक मारा करीत रिव्हर्स स्विंगने इंग्लंडला अडचणीत आणले. त्यांनी केवळ राजकोटमध्येच नाही तर न्यूझीलंडविरुद्धही चांगली गोलंदाजी केली. भुवीदेखील उल्लेखनीय ठरला.’भारताच्या क्षेत्ररक्षणाबाबत बोलताना प्रशिक्षक म्हणाले, ‘क्षेत्ररक्षणामुळे आम्ही निराश झालो. गेल्या साडेतीन महिन्यात खेळाच्या तिन्ही विभागामध्ये कामगिरी चांगली होती, पण आता कॅचिंगवर मेहनत घ्यावी लागेल.’ (वृत्तसंस्था)
...त्यामुळेच राहुलची निवड - कुंबळे
By admin | Published: November 15, 2016 11:56 PM