paris olympics 2024 updates : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे अमेरिकेचा दबदबा पाहायला मिळाला. त्यांनी सर्वाधिक पदके जिंकण्यात यश मिळवले. यात वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलानेही हातभार लावला. त्याने दोन सुवर्ण पदक जिंकली. अमेरिकेच्या रॉय बेंजामिनने ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले. त्याने सर्वोत्तम कामगिरी करत ४६.४६ सेकंदात अंतर गाठले. बेंजामिनने ऑलिम्पिक चॅम्पियन कार्स्टन वॉरहॉमचा पराभव करून हा विजय संपादन केला. रायच्या विजयाचा आनंद केवळ अमेरिकाच साजरा करत नाहीतर कॅरेबियन देश अँटिग्वामध्ये अधिक आनंद साजरा केला जात आहे.
खरे तर राय बेंजामिन हा वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज विन्स्टन बेंजामिनचा मुलगा आहे. विन्स्टन हा अँटिग्वाचा आहे. विन्स्टनने १९८६ ते १९९५ दरम्यान आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना २१ कसोटी आणि ८५ वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला १६१ बळी घेण्यात यश आले. विन्स्टनच्या मुलाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. त्याने पुरुषांच्या ४×४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक मिळवले. रायने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते.
अमेरिकेत जन्मलेल्या राय बेंजामिनने सर्वप्रथम क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण, कालांतराने त्याने मार्ग बदलला. आपल्या मुलाला सुवर्ण पदक मिळताच माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिनने भावनिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, हे ऑलिम्पिक माझ्यासाठी विश्वचषक फायनलसारखे राहिले आहे. मी खूप भावना व्यक्त करणारा व्यक्ती नाही. मुलाने पदक जिंकले तो एक अविश्वसनीय क्षण होता. मी त्याच्या यशाने खूप आनंदी आहे कारण मला माहित आहे की त्याने किती परिश्रम केले, मला माहित आहे की त्याच्यासाठी ते किती कठीण होते. त्याला याचा किती आनंद झाला असेल हे मला ठाऊक आहे.