मुंबई : दादर, शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात १७ ते २६ जून या कालावधीत ३२ वे समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात मल्लखांबाचे विविध प्रकार, मुक्तहस्त व्यायाम व योगासनांचे धडे देण्यात येतील.५ वर्षांवरील मुला-मुलींसाठी खुल्या असलेल्या या शिबिरात महिलांसाठीदेखील विशेष वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शिबिरात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू- प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक व शारीरिक स्पर्धादेखील पार पडणार आहे. या स्पर्धेत ६० टक्के गुण मिळवणाऱ्या खेळाडूंना संस्थेत नियमित प्रशिक्षणासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली. तसेच शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मल्लखांब, जलदीपासने, योगमनोरे, पोल मल्लखांब यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त व्यायाम देणारा खेळ म्हणून मल्लखांब ओळखला जातो. त्यामुळे या मराठमोळ्या खेळाचा फायदा घेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे अवाहन आयोजकांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)
दादरमध्ये पावसाळी मल्लखांब शिबिर रंगणार
By admin | Published: June 17, 2016 3:09 AM