अहमदाबाद : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर शेन वॉटसन व अजिंक्य रहाणे यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रविवारी चेन्नई सुपरकिंग्सचा ८ गडी व १० चेंडू राखून पराभव केला आणि आयपीएलच्या आठव्या पर्वात विजयाची मालिका कायम राखली. चेन्नई सुपरकिंग्स संघाचा यंदाच्या सत्रातील हा पहिला पराभव ठरला. राजस्थानने चेन्नईचा डाव ४ बाद १५६ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १८.२ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळणारा कर्णधार शेन वॉटसन (७३ धावा, ४७ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार) व अजिंक्य रहाणे (नाबाद ७६ धावा, ५५ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) यांनी सलामीला १४४ धावांची भागीदारी करीत संघाचा विजय निश्चित केला. वॉटसन बाद झाला त्यावेळी संघाला विजयासाठी केवळ १३ धावांची गरज होती. स्टीव्हन स्मिथ (६) बाद झाल्यानंतर रहाणेने करुण नायरच्या (नाबाद ०१) साथीने संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.त्याआधी, ड्वेन ब्राव्होच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने ४ बाद १५६ धावांची मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना चेन्नई संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ३१) व ब्राव्हो यांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्येची मजल मारून दिली. ब्राव्होने ३६ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकार ठोकला, तर धोनीने ३७ चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ३१ धावा केल्या.ब्राव्होने यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक केवळ २९ चेंडूंमध्ये पूर्ण केले. त्याआधी, ड्वेन स्मिथने २९ चेंडूंमध्ये ४० धावांची खेळी केली. चेन्नई संघाची एकवेळ ३ बाद ३९ अशी अवस्था झाली होती. ब्रेंडन मॅक्युलमला (१२) अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबेने तंबूचा मार्ग दाखवला. सुरेश रैना (४) ख्रिस मॉरिसचे लक्ष्य ठरला. अंकित शर्माने फॅफ ड्यूप्लेसिसला बाद करीत चेन्नईची ३ बाद ३९ अशी अवस्था केली. स्मिथने डाव सावरण्याची आशा निर्माण केली; पण फॉल्कनरने त्याचा अडथळा दूर केला. स्मिथच्या खेळीत ३ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
राजस्थानची विजय ‘पंचमी’
By admin | Published: April 20, 2015 1:44 AM