अहमदाबाद : चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाला मंगळवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अपराजित असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब संघापुढे या लढतीत चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे.राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत आतापर्यंत सलग पाच सामने जिंकले आहेत. त्यात चार लढतींत त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळविला. राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये बलाढ्य संघांत समावेश असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध रविवारी ८ गडी राखून विजय मिळविला. अजिंक्य रहाणे व शेन वॉटसन यांनी ९७ चेंडूंमध्ये १४४ धावांची भागदारी करून चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले. पंजाब संघापुढे रहाणेला रोखण्याचे आव्हान आहे. रहाणेने या स्पर्धेत ५७.७५च्या सरासरीने सर्वाधिक २३१ धावा फटकावल्या आहेत. लेग स्पिनर प्रवीण तांबेने ६.७६च्या सरासरीने ५ बळी घेतले आहेत. पंजाबची गोलंदाजीमध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे; पण त्यांच्या फलंदाजांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या वर्षी उपविजेतेपद पटकावणाऱ्या पंजाब संघाची यंदाच्या मोसमात सुरुवात विशेष चांगली झालेली नाही. पंजाब संघाला चारपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळविता आला आहे. वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय या आक्रमक सलामीवीरांना या स्पर्धेत संघाला अद्याप चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. केकेआरविरुद्ध गेल्या लढतीत आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरला विश्रांती देताना अष्टपैलू थिसारा परेराला संधी देण्याची योजना यशस्वी ठरलेली नाही. ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. मॅक्सवेलने १५.२५च्या सरासरीने केवळ ६१ धावा केल्या आहेत. विश्वकप स्पर्धेत शानदार फॉर्मात असलेल्या या आॅस्ट्रेलियन फलंदाजाने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. (वृत्तसंस्था)
पंजाबपुढे राजस्थानचे कडवे आव्हान
By admin | Published: April 21, 2015 12:42 AM