ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १२ - भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत रहाण्याकडे झुकू लागला आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या बिनबाद ११४ धावा असून एकूण १६३ धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ४८८ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात इंग्लंडने भारतावर ४९ धावांची आघाडी घेतली.
चार बाद ३१९ वरुन भारताने डाव पुढे सुरु केल्यानंतर चौथ्या दिवशी भारताने आणखी १६९ धावांची भर घातली. इंग्लंडकडून लेगब्रेक गोलंदाज आदिल राशिदने भेदक मारा करत सर्वाधिक चार गडी बाद केले. कर्णधार विराट कोहली राशिदच्या गोलंदाजीवर ४० धावांवर हिट विकेट झाला. अश्विनने ७० धावांची अर्धशतकी खेळी केल्यामुळे इंग्लंडला भारतावर मोठी आघाडी मिळवता आली नाही.
त्याला यष्टीरक्षक वृद्धीमान सहाने ३५ धावा काढून चांगली साथ दिली. तिस-या दिवशी चेतेश्वर पूजारा आणि मुरली विजयने दुस-या विकेटसाठी २०९ धावांची भागादारी केली होती. हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज मोठी खेळी आणि भागीदारी करण्यात असफल ठरले. कर्णधार अॅलिस्टर कूक ४६ आणि हमीदची ६२ जोडी मैदानावर आहे. इंग्लंडच्या बिनबाद ११४ धावा झाल्या आहेत.