मुंबई : प्रेक्षकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि धक्कादायक निकालांनी गाजलेल्या स्पर्धेत भारतीय रेल्वेच्या राम निवास याने अनपेक्षित बाजी मारताना तळवलकर्स क्लासिक २०१५ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या किताबावर कब्जा केला. विशेष म्हणजे गतमहिन्यात झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा महाराष्ट्राचा जगदीश लाड आठव्या क्रमांकावर राहिल्याने प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली, तर गतविजेता भारतीय नौदलाच्या मुरली कुमारला थेट तळाला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी प्रथमच झालेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेत श्वेता राठोड - रायन कन्नेल या जोडीने बाजी मारत उपस्थितांची मने जिंकली.माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहामध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवप्रमींनी उपस्थिती दर्शवली होती. स्पर्धेच्या सुरुवातीला प्रेक्षकांचा दिसलेला जोष अंतिम क्षणी एकाएकी नाहीसा झाला. ज्या शरीरसौष्ठवपटूंना अव्वल तीनमध्ये पाहण्याची इच्छा होती ते तळाच्या पाच स्थानांमध्ये राहिल्याने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. त्याचप्रमाणे सर्वाधिक अपेक्षा असलेला मुंबईकर सुनीत जाधव सुरुवातीलाच स्पर्धेबाहेर पडल्यानेही प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला.अव्वल दहा खेळाडूंच्या अंतिम फेरीत रेल्वेच्या राम निवासने सर्वच बलाढ्य खेळाडूंना आव्हान देत अनपेक्षित बाजी मारली. जागतिक स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूंचे कोणतेही दडपण न घेता त्याने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत पंचांचे लक्ष वेधले. उत्तर प्रदेशच्या यतिंदर सिंगनेही अनपेक्षित कामगिरी करताना द्वितीय क्रमांकावर कब्जा केला. प्रेक्षकांमधून मोठा प्रतिसाद मिळालेल्या ४९ वर्षीय अनुभवी बॉबी सिंग याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गतमहिन्यात बँकॉक येथे झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद थोडक्यात हुकलेल्या बॉबीने ८० किलो वजनी गटात भारताला सुवर्ण मिळवून दिले होते. त्यामुळे त्याच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होती. (क्रीडा प्रतिनिधी) स्पर्धेतील अव्वल दहा खेळाडू१. राम निवास (विजेता, भारतीय रेल्वे), २. यतिंदर सिंग (उत्तर प्रदेश), ३. ए. बॉबी सिंग (भारतीय रेल्वे), ४. विपीन पीटर (भारतीय नौदल), ५. सागर कातुर्डे (महाराष्ट्र), ६. सागर जाधव (भारतीय रेल्वे), ७. बी. महेश्वरन (महाराष्ट्र), ८. जगदीश लाड (महाराष्ट्र), ९. मुकेश सिंग (दिल्ली), १०. मुरली कुमार (भारतीय नौदल).
राम ठरला ‘क्लासिक’ बॉडीबिल्डर
By admin | Published: December 19, 2015 12:17 AM