नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष (आयओए) एन. रामचंद्रन आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेले मतभेद बुधवारी संपुष्टात आले. दोघांनीही वादाला तिलांजली देत भारतीय क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी; तसेच आॅलिम्पिक आंदोलनात देशाला सन्मान मिळवून देण्यासाठी हातात हात मिळवून काम करण्याची ग्वाही दिली.आमच्यात दिलजमाई झाल्याचे पत्र आज पत्रकारांना देण्यात आले. या पत्रावर रामचंद्रन आणि बत्रा यांची स्वाक्षरी आहे. दोघांनीही एका स्वरात आम्ही सर्व आरोप-प्रत्यारोप, तक्रारी आणि कायदेशीर तक्रारी मागे घेण्यास सहमती दर्शविली, असे सांगितले. भविष्यात एकत्र काम करण्याची ग्वाही सर्वांना देत असल्याचे दोघांनीही म्हटले आहे.बत्रा हे आयओएचे उपाध्यक्षदेखील आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्या ते रिंगणात आहेत. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती तसेच आशियाई आॅलिम्पिक परिषदेने अलीकडे रामचंद्रन यांना त्यांच्या आॅलिम्पिक सेवेबद्दल सन्मानित केले होते. रामचंद्रन हे विश्व स्क्वॅश महासंघाचे अध्यक्ष आहेत.रामचंद्रन-बत्रा यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. बत्रा यांनी रामचंद्रन यांची आयओए प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यासाठी विविध राज्य आॅलिम्पिक संघटनांचा पाठिंबा मिळविला होता. आयओए अध्यक्ष आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष आता परस्परांविरुद्धचे दावे परत घेतील. भविष्यात एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करणार नाहीत. ही बाब दोघांनीही वैयक्तिक आणि अधिकृतपणे स्पष्ट केली.एका संयुक्त निवेदनात दोघेही म्हणाले, ‘आॅलिम्पिक समुदायातील मित्रांचा सल्ला आणि मध्यस्थी यांचा सन्मान करीत आम्ही दोघेही सर्वच वादविवादांना मूठमाती देत आहोत. परस्परांविरुद्धचे सर्व वाद मिटवून भविष्यात असे वर्तन होणार नाही, याची काळजी घेणार आहोत. देशाचे आॅलिम्पिक आंदोलन कसे पुढे न्यायचे, यासाठी दोघेही प्रयत्नशील राहू.’ (वृत्तसंस्था)>रामचंद्रन-बत्रा वादाचा परिणाम भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या कामकाजावर झाला आहे. रिओ आॅलिम्पिकच्या वेळी या वादाचा परिणाम पाहायला मिळाला. अनेक महिने दोघांमधील वाद माध्यमांमध्ये गाजले. ओसीए आणि आयओसीच्या दारात हा वाद पोहोचला होता. दोन्ही विश्व संस्थांनी रामचंद्रन आणि बत्रा यांना ‘हॅप्पी हॅन्डिंग’ करण्याचा वारंवार सल्ला दिला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले.>रामचंद्रन यांनी बत्राांविरुद्ध मद्रास हायकोर्टात दाखल केलेला १० कोटींचा मानहानीचा दावा परत घेण्यास सहमती दर्शविली. दोघांनी समझोत्यावर संयुक्तपणे स्वाक्षरी केली. दोघांच्याही वकिलांनी यास दुजोरा दिला. हे संमतीपत्र बुधवारी मद्रास हायकोर्टात पाठविण्यात आले.>रामचंद्रन यांनीही बत्रा यांच्याविरुद्ध 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता.
रामचंद्रन-बत्रा यांच्यात अखेर दिलजमाई
By admin | Published: November 03, 2016 4:37 AM