ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुहा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर चार जणांची प्रशासकीय समिती नियुक्त केली होती. रामचंद्र गुहा या समितीवर होते. व्यक्तीगत कारणांसाठी आपण राजनीमा देत असल्याचे गुहा यांनी सांगितले.
कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आहेत. माजी क्रिकेटपटू डायना इडुलजी, विक्रम लिमये, विनोद राय आणि रामचंद्र गुहा या चौघांची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली होती. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची बीसीसीआयची तयारी नसल्याने यावर्षी 30 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकीय समितीची नियुक्ती केली.
आणखी वाचा
भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयच्या भवितव्यासंदर्भात प्रशासकीय समिती महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता होती. त्यावेळी गुहा यांनी राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने आयपीएलसाठी निविदा मागवल्या आहेत. पुढच्या पाचवर्षांसाठी प्रसार हक्क विकायचे आहेत. हे निर्णय बाकी असताना गुहा यांनी आपले पद सोडले. एका राज्य, एक मत ही शिफारस लागू करण्यात विनोद राय समिती यशस्वी ठरलेली नाही.
अजूनही बीसीसीआयमध्ये लोढा समितीच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. आयसीसीकडून मिळणा-या महसूलातही मोठी कपात झाली आहे त्यावरुन बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रशासकीय समितीमध्ये मतभेद आहेत.