ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामधील संघर्ष वारंवार समोर येत असताना यादरम्यान प्रशासकीय समितीमधून राजीनामा देणारे रामचंद्र गुहा यांचं राजीनामा पत्र समोर आलं आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपासून ते सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समिती सर्वांवर निशाणा साधला आहे. रामचंद्र गुहा यांनी महेंद्रसिंग धोनी कसोटी संघात नसतानाही त्याचा ए ग्रेड कायम ठेवण्यावर नाराजी दर्शवली आहे. याशिवाय रामचंद्र गुहा यांनी राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सुनील गावस्करांवरही निशाणा साधला आहे.
काय आहे चिठ्ठीत -
समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना लिहिलेल्या पत्रात रामचंद्र गुहा यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. त्यांनी खासकरुन भारतीय क्रिकेटमधील स्टाऱ खेळाडूंना लक्ष्य केलं आहे. बीसीसीआय मोठ्या खेळाडूंकडे जास्त लक्ष्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच प्रशासकीय समिती अनेक मुद्यांवर निर्णय घेण्यास असमर्थ राहिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
गुहा यांनी सांगितलं की, राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आयपीएलसाठी आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या भारत अ आणि भारत ज्यूनिअर संघाचे प्रशिक्षकदेखील आहे. मात्र त्याचं संपुर्ण लक्ष आयपीएकडे असल्याचा आरोप त्यांनी केला. बीसीसीआयच्या करारात समालोचक म्हणून समाविष्ट असणा-या सुनील गावस्कर यांना प्लेअर मॅनेजमेंट कंपनीचं प्रमुख करण्यावरही गुहा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अनिल कुंबळेसाठी बॅटिंग
पत्रात गुहा यांनी अनिल कुंबळे यांच्यावरुन सुरु असलेल्या वादाचाही उल्लेख केला आहे. हा वाद अव्यवसायिकपणे हाताळला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. कुंबळेंचा इतका चांगला रेकॉर्ड असतानाही करार न वाढवण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय समिती स्थानिक क्रिकेटर्सकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनात खूप अंतर असल्यानेच ही वागणूक देत असल्याचंही म्हटलं आहे.
रामचंद्र गुहा यांनी प्रशासकांच्या समितीमधून (सीओए) राजीनामा दिला असून त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला आहे. भारतीय प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चेसोबत या घटनेचा संबंध जोडला जात आहे. गुहा यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. गुहा यांच्या निर्णयामुळे सीओएला आश्चर्य वाटले आहे. गुहा यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयाबाबत सीओएतील आपल्या सहाकाऱ्यांसोबत चर्चा केली नाही. मी माझ्या निर्णयाबाबत समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना सांगितले असल्याचे गुहा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. गुहा यांना व्यावसायिक व्यस्ततेमुळे बीसीसीआयच्या बैठकीमध्ये सहभागी होत येत नव्हते. वेळ नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी चर्चा आहे.