- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांपैकी (सीओए) एक असलेले विक्र म लिमये हे जुलै महिन्यात बीसीसीआयचा निरोप घेण्याची शक्यता आहे.एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून रुजू होणार आहेत. सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. जेव्हा ते बीसीसीआयच्या प्रशासकपदाचा राजीनामा देतील, तेव्हाच त्यांना नवे पद भूषविता येईल. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लिमये प्रशासकपदाचा राजीनामा देतील, असे बोलले जाते. लिमयेंपूर्वी इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी वैयिक्तक कारण देत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी समितीचे अध्यक्ष आणि कॅगचे माजी प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून सात प्रश्न विचारले होते. त्यांनी पत्रात म्हटले होते की, राष्ट्रीय प्रशिक्षक आयपीएलमधून मिळणाऱ्या मोठ्या रकमेपायी राष्ट्रीय संघांबरोबर समझोता करतात. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे टीम इंडियाच्या ‘अ’ आणि ज्युनिअर टीमचाही प्रभार आहे.गुहा यांनी धोनीला ‘अ’ श्रेणीत ठेवण्यावर आक्षेप नोंदवला होता. कसोटी न खेळताही धोनीला ‘अ’ श्रेणीत का ठेवण्यात आले. चांगल्या कामगिरीनंतरही कुंबळेवर शंका घेण्यात आली. त्याचबरोबर गुहा यांनी काही खेळाडूंना विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला होता.रामचंद्र गुहा यांनी सुनील गावसकर यांच्या प्लेअर मॅनेजमेंटच्या प्रमुखपदी केलेल्या नेमणुकीवरही आक्षेप नोंदवला होता. याशिवाय पदावरून काढण्यात आलेले पदाधिकारीही सातत्याने बैठकीत उपस्थित राहण्यावर गुहा यांनी सवाल उपस्थित केला होता. भारतीय क्रि केटर्सची आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर तुलना करून उपेक्षा केली जाते. त्यांच्या सामना शुल्कात मोठा फरक आहे, असे त्यांनी म्हटले होते.समितीत जवागल श्रीनाथचा समावेश करण्याची सूचना गुहा यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी मानत बीसीसीआयवर चार प्रशासकांची एक समिती (सीओए)बनवली होती. समितीत सदस्य रामचंद्र गुहा हे सदस्य होते.