रणजी कर्नाटक
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
कर्नाटकचे वर्चस्व
कर्नाटकचे वर्चस्वरणजी करंडक : आसाम ३ बाद ५८इंदूर : पहिल्या डावात ४५२ धावांची दमदार मजल मारणाऱ्या कर्नाटक संघाने दुसऱ्या दिवसअखेर आसामची पहिल्या डावात ३ बाद ५८ अशी अवस्था करीत रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वर्चस्व मिळविले आहे. कालच्या २ बाद ३०२ धावसंख्येवरून पुढे खेळताना कर्नाटकने आज ५४.२ षटकांत १५० धावांची भर घातली. सलामीवीर रॉबिन उथप्पाने १५३ धावांची खेळी केली. रविकुमार समर्थला (४६) आज केवळ ७ धावांची भर घालता आली. मनीष पांडे याने ३६ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक चिदंबरम गौतम ४४ धावा काढून नाबाद राहिला तर तळाचा फलंदाज श्रेयस गोपाल याने ३८ धावांचे योगदान दिले. आसामतर्फे कृष्णा दास सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १०१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना आसामची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर पल्लवकुमार दास व शिवशंकर राय अनुक्रमे ११ व १६ धावा काढून तंबूत परतले. कर्णधार धीरज जाधवही (३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मंगळवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी गोकुल शर्मा (१८) व यष्टिरक्षक फलंदाज अरुण कार्तिक (५) खेळपट्टीवर होते. कर्नाटकतर्फे गोपालने ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. श्रीनाथ अरविंदने एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)