- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) २०१६-२०१७ च्या स्थानिक क्रिकेट मोसमाची घोषणा केली असून यंदा रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थस्थळी होणार आहे. यानुसार ८३ वे रणजी सत्र ६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. पदार्पण करणारा छत्तीसगड संघ रांची येथे त्रिपुराविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.
सिनियर, ज्युनियर आणि महिला क्रिकेटचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने मे महिन्यात सर्व स्थानिक सामने टस्थस्थळी करण्याची शिफारस केली होती. तटस्थस्थळी सामन्यांचे आयोजन झाल्यास कुठल्याही संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा अतिरिक्त लाभ मिळणार नाही. याशिवाय सर्व खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव मिळेल. रणजी मोसमासाठी ग्रुप अ आणि ग्रुप ब मध्ये प्रत्येकी नऊ संघांचा तर ग्रुप क मध्ये दहा अशा २८ संघांचा स्पर्धेत समावेश आहे. क्वार्टरफायनल्स १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होतील. अ आणि ब गटातून प्रत्येकी तीन तसेच क गटातून दोन असे एकूण आठ संघ क्वार्टरफायनल्ससाठी पात्र ठरतील.
सेमीफायनल्स २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होतील. ७ ते ११ जानेवारीदरम्यान रणजी करंडकाचा अंतिम सामना खेळविला जाईल. विजय हजारे वन डे ट्रॉफी, आंतर झोनल टी-२० स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या सर्व स्पर्धा रणजी करंडक आटोपल्यानंतरच घेण्यात येणार आहेत.
रणजी करंडकासाठी संघांचे ग्रुप :-
ग्रूप अ : मुंबई, बडोदा, पंजाब, मध्य प्रदेश, बंगाल, गुजरात, तामिळनाडू,
रेल्वे आणि उत्तर प्रदेश.
ग्रुप ब : सौराष्ट्र, ओडिशा, दिल्ली, महाराष्टÑ, आसाम, विदर्भ, कर्नाटक,
राजस्थान आणि झारखंड.
ग्रुप क : हैदराबाद, हरियाणा, केरळ, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, सेनादल,
गोवा, जम्मू काश्मीर, आंध्र आणि छत्तीसगड.