रवी शास्त्री लिहितात...
डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि युवराजसिंग यांच्यासारख्या दिग्गज डावखुऱ्या फलंदाजांचा सनरायजर्स हैदराबाद संघात समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये २०० पेक्षा अधिक धावा फटकावणारातो एकमेव संघ आहे. बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध हैदराबाद संघाला मोठ्या धावसंख्याची गरज भासणार आहे. कारण मुंबईने जास्तीत जास्त सामन्यांत १७० पेक्षा अधिक धावा फटकावल्या असल्याचे दिसून येते. हैदराबाद संघाला आता मुंबईसारख्या बलाढ्य संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हैदराबाद संघाला सिंहाच्या गुहेत जाऊन शिकार करायची असेल तर त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. यात हैदराबाद संघ यशस्वी ठरला तर आयपीएलच्या दहाव्या पर्वात त्यांची वाटचाल शानदार राहील. हैदराबाद संघ एका युवा खेळाडूमुळे चर्चेत आहे. अफगाणिस्तानमधील प्रतिकूल परिस्थितीतही राशिद खानने फिरकी गोलंदाजीची कला आत्मसात केली आहे. या लेग स्पिनर गोलंदाजाने सर्वोत्तम फलंदाजांपैकी एकाला पायचित करण्यात यश मिळवले आहे. तो फलंदाज बचावात्मक पद्धतीने फलंदाजी करताना बाद झाला आहे, हे विशेष. यावरून राशिदची प्रतिभा सिद्ध होते. त्याचे लेग स्पिन व गुगली चेंडू ओळखणे सोपे नाही. त्याचसोबत त्याची अचुकता व विविधता फलंदाजांना इशारा देण्यास पुरेशी आहे. याव्यतिरिक्त तो डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. हैदराबादने त्याच्या गोलंदाजी स्पेलचा योग्य वेळी वापर करायला पाहिजे. हैदराबादने त्याच्या गोलंदाजीचा टप्प्या-टप्पात वापर केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. राशिद अँड कंपनीकडून तळापर्यंत फलंदाजी असलेल्या मुंबई संघाला आव्हान मिळणार आहे. रोहित शर्मा अपयशी ठरला तरी मुंबई संघ विजय मिळवण्यास सक्षम आहे. त्यामुळे मुंबईची फलंदाजी मजबूत असल्याचे सिद्ध होते. लक्ष्याचा पाठलाग करताना हा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. हैदराबाद संघ बुधवारी निश्चितच मुंबई संघाला टक्कर देण्यास उत्सुक आहे. उभय संघांदरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये रंगतदार लढतीची प्रतीक्षा आहे. (टीसीएम)