बरनाला (पंजाब) - भारताला 1978च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देणारे हकाम सिंग भट्टल यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी हकाम यांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
हकाम सिंग भट्टल यांनी आशियाई स्पर्धेत 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकूले होते आणि आज वयाच्या 64व्या वर्षी हा खेळाडू मृत्यूशी झुंज देत आहे. यकृत आणि मुत्रपिंडच्या आजाराने ग्रस्त असलेले हकाम येथील संग्रूर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणारे पैसा कुटुंबीयांकडे नाही आणि मदतीसाठी त्यांची सरकारी कचेरीत पायपीट सुरू होती.
क्रीडा क्षेत्रातील योगदानासह त्यांनी देशसेवाही केली आहे. 1972 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले. मात्र, त्यांचे दुर्दैव कुटुंबीयांना त्यांना उपचारासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे हकाम हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री राजींदर कौर भट्टल यांच्या गावातील रहिवाशी आहेत. हकाम यांना 29 ऑगस्ट 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते ध्यान चंद पुरस्काराने गौरवण्यात आले होते.