टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठी प्रबळ दावेदार मानल्या गेलेले रवी शास्त्री यांची या पदावर निवड न झाल्यामुळे निराश झाले आहे. शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयावर निराशा व्यक्त करताना नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षकपदासाठी निवड न झाल्यानंतर शास्त्री म्हणाले, ‘मी या निर्णयामुळे निराश झालो. गेले १८ महिने संघाचा संचालक म्हणून कसून मेहनत घेतली आणि संघाने निकालही चांगले दिले. त्यानंतरही मला ही जबाबदारी सोपिवण्यात न आल्यामुळे निराश झालो. पण, केवळ वर्षभराचा कालावधी देण्यात आल्यामुळे मला अधिक दु:ख झाले नाही. आता भविष्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.’ शास्त्री यांनी २०१४ मध्ये या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारताने इंग्लंडला वन-डे मालिकेत पराभूत केले. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकप स्पर्धेत संघाने सलग सात सामने जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने श्रीलंकेत २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० ने शानदार विजय मिळवला.
निवड न झाल्याने रवी शास्त्री निराश
By admin | Published: June 25, 2016 2:50 AM