नवी दिल्ली : एकेकाळी भारतीय संघातील माझे माजी सहकारी रवी शास्त्री भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याचे प्रबळ दावेदार आहेत, असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. शास्त्री यांनी बीसीसीआयकडे अर्ज सादर करण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. त्यानंतर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत शास्त्री सर्वांत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. शास्त्री यांनी आॅगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीत भारतीय संघाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. कर्णधार विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंसोबत शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका जिंकली होती. त्यानंतर विश्वकप आणि विश्व टी-२० स्पर्धेत (अनुक्रमे २०१५ व २०१६) भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली होती. श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच देशात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाला आॅस्ट्रेलियात टी-२० मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली. यापूर्वी, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, व्यंकटेश प्रसाद, रिचर्ड पायबस, डोडा गणेश फिल सिमन्स आणि लालचंद राजपूत यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत.(वृत्तसंस्था)शास्त्री यांनी संघाच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, २०१४ मध्ये भारतीय संघाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने शास्त्री यांना संघाचे संचालकपद स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर संघाचे नशीब बदलले. आता त्यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असून त्यांची नक्कीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.- सुनील गावसकर
प्रशिक्षकपद रवी शास्त्रीला मिळण्याची शक्यता : गावसकर
By admin | Published: July 05, 2017 1:50 AM