नवी दिल्ली : गेले काही दिवस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे बीसीसीआयमधील वातावरण ढवळून निघाले आहे. कुणीही तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. तर्क-वितर्कांना पेव फुटले असताना विराट कोहली मात्र सर्वांवर मात करून गेला. स्वत:च्या पसंतीचे रवी शास्त्री प्रशिक्षकपदी यावेत म्हणून हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचे मीडियात प्रकाशित झाले. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचा मंगळवारी निर्णय घेतल्याने कोहलीची खेळी यशस्वी ठरल्याचे निष्पन्न झाले. बीसीसीआयनेदेखील प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची तारीख ९ जुलैपर्यंत वाढविली.शास्त्री हे फार इच्छुक असून पदासाठी अर्ज करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, २०१९ च्या विश्वचषकापर्यंत संपूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ सोपविण्याची हमी हवी असल्याची शास्त्री यांची अट आहे. शास्त्री यांना गोलंदाजी कोच भरत अरुण यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफदेखील स्वमर्जीतील हवा आहे. या सर्वांनी आधीच्या कार्यकाळात चांगली भूमिका बजावल्याचे शास्त्रींचे म्हणणे आहे. शास्त्री हे आॅगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीत भारतीय संघाचे संचालक राहिले. त्यांची जागा कुंबळे यांनी नंतर मुख्य कोच म्हणून घेतली. अलीकडे कोहलीशी मतभेद होताच कुंबळे यांनी पद सोडले आहे. कोच म्हणून शास्त्री हे कोहलीची प्रथम पसंती असून, दोघांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत, हे विशेष. अगदी ठरल्याप्रमाणे अखेर रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्याचे ठरवले. स्वत: रवी शास्त्री यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळे यांना मुदतवाढ मिळूनही कुंबळेंनी राजीनामा दिल्यामुळे बीसीसीआयला प्रशिक्षकपदाच्या अर्जासाठी मुदतवाढ द्यावी लागली. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातील काही खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली अनिल कुंबळेंऐवजी रवी शास्त्री यांच्या नावासाठी आग्रही होते. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर प्रशिक्षक म्हणून निवड होणार असेल अशी खात्री बीसीसीआय देणार असेल तरच आपण अर्ज करू, असा पवित्रा शास्त्रींनी घेतल्याचे म्हटले जाते.
रवी शास्त्री प्रशिक्षक पदासाठी मैदानात
By admin | Published: June 28, 2017 12:45 AM