हैदराबाद : फिरकीपटू आर. आश्विन याच्याकडे विकेट मिळविण्याची शानदार क्षमता आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. कसोटी, एकदिवसीय, टी-टष्ट्वेन्टी या तीनही प्रकारांसाठी त्याने स्वत:ला सिद्ध केले असून, हीच गोष्ट त्याला मॅचविनर गोलंदाज बनविते, अशा शब्दांत भारताचा माजी गोलंदाज व्यंकटपती राजू याने आश्विनची स्तुती केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल कसोटी गोलंदाजाचे स्थान त्याने पटकावले आहे. याविषयी बोलताना राजू म्हणाला, की भारताकडे प्रत्येक वेळी फिरकी गोलंदाजांची एक सक्षम फळी राहिली आहे. अनिल कुंबळे, हरभजनसिंग यांनीदेखील आपापली भूमिका समर्थपणे सांभाळली. सध्या संघाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका आश्विन सांभाळत आहे. आश्विनच्या नैसर्र्गिक गोलंदाजीतच खूप विविधता आहे. त्यामुळे बळी मिळविण्यासाठी त्याला दुसरे काही करण्याची गरज नाही. त्याने स्वत:च्या नैसर्गिक गोलंदाजीपेक्षा इतर काही करण्याचे प्रयोग केले; मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही. त्याला पुन्हा आपल्याच मूळ शैलीचाच अंगीकार करावा लागला. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांच्याविषयी बोलताना राजू म्हणाला, की संघात प्रतिस्पर्धी असणे एका दृष्टीने चांगले असते. निकोप स्पर्धा असेल तर संघ निवडकर्त्यांसाठी ते आव्हानात्मक असते. या वर्षी भारतात १३ सामने खेळले जाणार आहेत. त्यात फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे सध्या बहरात असलेले खेळाडू आपल्याला हवे आहेत. दुखापत, थकावट यामुळे चांगल्या खेळाडूंची उपलब्धता आवश्यक असते. सामना जिंकण्यासाठी जितकी षटके टाकावी लागतील त्याचा विचार केल्यास संघात तीन फिरकीपटू असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फिरकीतील विविधता असणे गरजेचे आहे. आपल्याकडे लेग व आॅफस्पिन करणारे गोलंदाज असल्याने चांगले संतुलन आहे. भारतात होत असलेल्या आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धेत जो संघ शानदार क्षेत्ररक्षण करेल व संधीचा अधिकाधिक फायदा उठवेल, तो संघ वरचढ ठरेल. यजमान भारतीय संघावर प्रेक्षकांचा अधिक दबाव असेल. भारतीय संघाला हरताना पाहणे प्रेक्षकांना नको असते. त्यामुळे असा दबाव झेलून अव्वल कामगिरी करणाऱ्या संघाला विजयाची अधिक संधी असेल. - व्यंकटपती राजू,माजी क्रिकेटपटू
रविचंद्रन आश्विन भारताचा शानदार फिरकीपटू
By admin | Published: January 04, 2016 3:04 AM