बुडापेस्ट : ६१ किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारताच्या रविंदरला २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात रविंदरचा किर्गिस्तानच्या उलुकबेक झोलदोशबेकोव याच्याविरुद्ध ३-२ असा पराभव झाला.
याआधी रविंदरने २०१६ साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ साली कॅडेट आशिया अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेवहिले पदक ठरले. तसेच स्पर्धा इतिहासात भारताचे हे पाचवे पदक ठरले. याआधी बजरंग पुनिया (६५ किलो), विनोद कुमार (७०) आणि महिला मल्ल रितू फोगाट (४८) यांनी पोलंड येथे झालेल्या पहिल्या स्पर्धेत प्रत्येकी रौप्य पदक जिंकले होते. गेल्यावर्षी रवी दहिया (५७) याने रौप्य जिंकले होते व त्यावेळी तो पदक जिंकणारा एकमेव भारतीय ठरला होता.
अंतिम सामन्यात बाजी मारण्यासाठी रविंदरकडे चांगली संधी होती. मात्र त्याला उलुकबेकच्या भक्कम खेळापुढे अपेक्षित यश मिळाले नाही. उलुकबेकने २०१८ साली वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. रविंदरने विश्रांतीपर्यंत आघाडी घेत आपले वर्चस्व राखले होते. मात्र, उलुकबेकने यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना सामन्याचे चित्र पालटले. रविंदरने उलुकबेकला रोखण्याचा चांगला प्रयत्न करताना अखेरच्या क्षणी दमदार फ्लिप केले. पण त्याचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला आणि उलुकबेकने सुवर्ण पदकावर आपला कब्जा केला.
या आधी रविंदरने वरिष्ठ युरोपियन चॅम्पियन आर्मेनियाच्या आर्सेन हारुतयुनानला ४ -३ अशी मात देत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे रविंदरकडून सुवर्ण पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. दुसरीकडे, भारताची ज्योती यादव५० किलो गटातून कांस्य पदकासाठी लढेल. उपांत्य फेरीत तिचा जपानच्या किका कागताविरुद्ध ४-१५ असा एकतर्फी पराभव झाला.