ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - ईएसपीएन क्रिकइन्फोच्या पोलनुसार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा स्थानिक सत्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. सप्टेंबर ते मार्च या कालावधीत जे १३ कसोटी सामने खेळले गेले त्यात जडेजाने २२.८३ च्या सरासरीने बळी घेतले शिवाय ४२.७६ च्या सरासरीने धावा काढल्या. या वेबसाईटच्या २०५०० फॉलोअर्सपैकी ६५ टक्के मते जडेजाच्या बाजूने पडली.दहा तज्ज्ञांच्या पॅनलमधील सहा जणांनी जडेजाला मत दिले. या पॅनलमध्ये संजय मांजरेकर, अजित आगरकर, आकाश चोप्रा यांचा समावेश होता. वेगवान गोलंदाज उमेश यादव याला वर्षातील सर्वोत्कृष्ट सहकारी खेळाडू म्हणून निवडण्यात आले. इंग्लंडचा हसीब अहमद हा यंदाच्या सत्रात पदार्पणातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. भारत-आॅस्ट्रेलियादरम्यान नुुकत्याच आटोपलेल्या मालिकेतील दुसरी कसोटी वर्षांतील सर्वोत्कृष्ट कसोटी ठरली.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा सर्वोत्कृष्ट पाहुणा खेळाडू ठरला. स्मिथला सर्व दहा तज्ज्ञांनी मते दिली. फॉलोअर्सनी रांची कसोटीत पुजाराने ठोकलेल्या २०२ धावांची खेळी सर्वोत्कृष्ट ठरविली. तज्ज्ञांनी मात्र पुण्याच्या टर्निंग ट्रॅकवरील स्मिथच्या १०९ धावांच्या खेळीला अव्वल स्थान दिले. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी नाथन लियोनचे नाव पुढे आले. त्याने बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात ५० धावांत ८ गडी बाद केले होते. तथापि काहींनी जडेजाच्या इंग्लंडविरुद्ध ४८ धावांत ७ गडी बाद करणाऱ्या कामगिरीला सर्वोत्कृष्ट पसंती दिली.(वृत्तसंस्था)