मुंबई : अलीम शेख आणि अल्ताफ मन्सुरी यांनी पहिल्या पाच मिनिटांत केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय) संघाने अंबरनाथच्या आॅर्डनन्स फॅक्टरी स्पोटस क्लबला २-० असे नमवले. यासह आरबीआयेने मुंबई हॉकी लीगच्या दुसऱ्या श्रेणीमध्ये विजयी आगेकूच केली. तर चौथ्या डिव्हिजनमध्ये कोळीवाड्याच्या गुरुनानक एचएस संघाने अंबरनाथच्या आॅर्डीनन्स बॉईज संघाला ६-३ असे लोळवले.मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या वतीने चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या श्रेणीत आरबीआयने जोरादार आक्रमण सामन्यावर नियंत्रण राखले. तिसऱ्याच मिनिटाला अलीम शेखने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवत वेगवान गोल झळकावून आरबीआयला १-० असे आघाडीवर नेले. या धक्क्यातून आॅर्डनन्स फॅक्टरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच पाचव्या मिनिटाला अल्ताफ मन्सुरीने संघाचा दुसरा गोल झळकावत आरबीयाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या आॅर्डनन्स फॅक्टरी संघाचे खेळाडू यानंतर संपुर्ण सामन्यात स्वत:ला सावरु शकले नाहीत. तर आरबीआयने देखील भक्कम बचाव करताना त्यांना गोल करण्यापासून वंचित ठेवले. चौथ्या श्रेणीत गुरुनानक एचएसने आॅर्डीनन्स बॉईजला ६-३ असे लोळवले. उत्कृष्ट सांघिक खेळ केलेल्या गुरुनानक संघाकडून विपीन कुशवा, आकाश गुप्ता, कार्तिक बहनोत, नितिन धिका, अजय यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्याचवेळी दुसरीकडे, आॅर्डीनन्स बॉईजच्या मांंबा, नीला आणि वेंकट यांनी प्रत्येकी एक गोल केला. (क्रीडा प्रतिनिधी)
आरबीआयची विजयी आगेकूच
By admin | Published: June 21, 2016 3:12 AM