ऑनलाइन लोकमतबेंगळुरु, दि. 27 - एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत सापडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पुढील वाटचालीसाठी उर्वरित सहापैकी प्रत्येक सामना जिंकणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आज गुजरात लायन्सविरुद्ध त्यांना विजय मिळवावाच लागेल. आरसीबी ‘प्ले आॅफ’च्या दौडमधून बाहेर पडणार नाही, याची काळजी त्यांच्या फलंदाजांना घ्यावीच लागेल. कारण फलंदाजीने त्यांना धोका दिला आहे. कर्णधार विराट कोहलीने चार सामन्यात १५४, ख्रिस गेलने पाच सामन्यात १४४ आणि डिव्हिलियर्सने चार सामन्यात केवळ १४५ धावा केल्या आहेत. कोहली अॅन्ड कंपनीला बाद फेरी गाठण्याची अद्यापही संधी आहे. गुजरात लायन्स संघ फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्यांच्यावर विजय नोंदविण्यासोबतच अन्य पाच सामने जिंकून कामगिरी सुधारायची झाल्यास फलंदाजांना शंभर टक्के योगदान द्यावे लागेल. लायन्सचे सात सामन्यात चार गुण आहेत. या संघाची फलंदाजी तितकी प्रभावी ठरलेली नाही. आघाडीचे फलंदाज अधूनमधून मात्र चमकले. जखमी ड्वेन ब्राव्होऐवजी संघात आलेला इरफान पठाण हा अंतिम एकादशमध्ये खेळेल का, हे पाहणे रंजक ठरेल. १०२ आयपीएल सामने खेळलेल्या इरफानच्या ११३७ धावा आणि १०२ बळी आहेत. यंदा इरफानला लिलावात कुणीही खरेदी केले नव्हते. मागच्या सामन्यात गुजरातने केकेआरवर विजय नोंदविला होता. तेच डावपेच आरसीबीविरुद्ध वापरण्याची कर्णधार सुरेश रैनाची इच्छा असेल. रैनावर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. ब्रँडन मॅक्यूलम, अॅरोन फिंच यांच्याकडूनही धावांची अपेक्षा राहील.गोलंदाजी ही गुजरातसाठी मुख्य समस्या ठरते. या संघाच्या गोलंदाजांनी सहा सामन्यात केवळ २६ गडी बाद केले. हॅट्ट्रिक घेणारा अॅण्ड्र्यू टाय पूर्णपणे फिट नाही तर रवींद्र जडेजा अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश्ी ठरला. प्रवीण कुमारचा मारा काहीसा बोथट झाला आहे. केवळ बासिल थम्बी याचा वेगवान मारा आतापर्यंत प्रभावी जाणवला. (वृत्तसंस्था)
आरसीबीला आता विजय हवाच
By admin | Published: April 27, 2017 5:48 PM