आकाश नेवे /आॅनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल. कोहलीने दिल्लीच्या चाहत्यांची निराशा केली नाही, कोटलाचे मैदान हे कोहलीचे होमग्राऊंड आहे. त्याने या खेळपट्टीवर आज दमदार खेळी केली. त्याच खेळीच्या बळावर आरसीबीने १६१ धावा केल्या आणि पवन नेगी, हर्षल पटेल यांच्या सुरेख गोलंदाजीने दिल्लीवर विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कोहलीला गवसलेला सूर हे सामन्यात महत्त्वाचे ठरले. त्याने ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. तीन षटकार आणि तीन चौकारलगावत केलेल्या या खेळीला विशेष महत्त्व आहे. या सामन्याचा आयपीएल गुणतालिकेवर कोणताही फरक पडणार नसला, तरी चाहत्यांनी विराट कोहलीची खेळी पाहण्याची स्टेडियममध्ये चांगलीच गर्दी केली होती. त्यांना पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला विराट बघायला मिळाला. कोहली आणि गेल बाद झाल्यावर आरसीबीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केली. ट्रॅव्हिस हेड आणि केदार जाधव, तर ताळमेळ नसल्यानेच धाव बाद झाले.त्यामुळे आरसीबीची धावसंख्या मर्यादित राहिली. अनुभवी जहीर खान याने कोहलीची खेळी संपुष्टात आणली. दिल्लीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पदार्पण करणाऱ्या आवेश खान याने संजू सॅमसनला बाद केले. मात्र करुण नायर, श्रेयस अय्यर आणि ऋषभपंतने दिल्लीचा डाव सांभाळला. मोहंमद शमी याने आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना ९ चेंडूत २१ धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. आरसीबी गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे. आतापर्यंत स्पर्धेत फक्त तीनसामन्यांत विजय मिळवता आला. मात्र स्पर्धेचा निरोप घेताना किमान अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान आरसीबीला असेल.