मुंबई : राष्ट्रीय केमिकल अॅण्ड फर्टीलायझर (आरसीएफ) संघाने सचिन पास्टेच्या अप्रतिम खेळाच्या बळावर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमवर (बीपीसीएल) ३६-२५ असा दणदणीत विजय साजरा केला. काशिलिंग अडके, विशाल माने आणि रिशांक देवाडिगा या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या आरसीएची मदार सचिनने समर्थपणे पेलली आणि एकाकी झुंज देत बाजी मारली. मध्यांतरापर्यंत आरसीएफकडे असलेली १६-१४ अशी अवघ्या २ गुणांची आघाडी सचिनच्या आक्रमक खेळाने वाढवली आणि आरसीएफला ११ गुणांनी विजय मिळवून दिला. बीपीसीएल आणि आरसीएफ यांच्यातील लढत सुरुवातीपासून चुरशीची दिसत होती. जितेश जोशी याने एकाच चढाईत आरसीएफच्या चार बचावपटूंना बाद करून आघाडी मिळवली. मात्र, आरसीएफच्या सचिनने सडेतोड उत्तर देत चढाईत तीन गडी टिपून सामन्यात चुरस निर्माण केली. सचिनने हाच खेळ पुढेही कायम राखल्यामुळे आरसीएफने प्रतिस्पर्धी संघावर दोन लोण चढवून विजय निश्चित केला. सचिनला सुदेश कुळे, शरद पवार आणि अमर निवाते यांनी अप्रतिम साथ दिली. बीपीसीएलकडून दीपचंद सिंग आणि नीलेश शिंदे यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले.पुरुष गटाच्या दुसऱ्या लढतीत एअर इंडियाने ३५-२६ अशा फरकाने स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया, कांदिवली (साई) संघाचा पराभव करून आगेकूच केली. सचिन पाटील आणि कृष्णा यांना बचावपटू मनोजकडून चांगली साथ मिळाली. साईकडून कृष्णा मदने व आशिष गव्हाणे यांनी कडवी टक्कर दिली. इतर समन्यात महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने ४०-१७ अशा फरकाने रेल्वे पोलिसांचा धुव्वा उडविला. (क्रीडा प्रतिनिधी)