ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २१ : ग्रीनपार्क सर्वांत जुने आणि ऐतिहासिक स्टेडियम आहे. येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले. यंदाच्या सत्रात अनेक सामन्यांचे आयोजन होणार असल्याचे सांगून विराटने भारतीय संघ सर्वोत्तम स्थानावर विराजमान होण्यासाठी तयार आणि उत्साही असल्याचे सांगितले. ईशांतऐवजी ज्याला संधी मिळेल त्याने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत चार की पाच गोलंदाज खेळतील याचा निर्णय सामना सुरू होण्याआधीच होईल, असे तो म्हणाला.
विकेटकडे फारसे लक्ष नसून सामना जिंकणे आणि त्यासाठी चांगली कामगिरी करणे हेच लक्ष्य असल्याचे विराटने सांगितले. उभय संघांकडे चांगले फिरकीपटू आहेत. आम्ही मात्र गोलंदाजीसोबतच फलंदाजीकडेही विशेष लक्ष देणार आहोत. चॅम्पियन बनायचे असेल तर प्रतिस्पर्धी संघाला कुठलीही संधी देऊ नका, अशी आपली भावना असून प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत मानू नका. पण अर्धा तास शिथिलता बाळगली तरी सामना हातचा घालविण्याची भीती असल्याची सावध भावना विराटने व्यक्त केली.