सिडनी : वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असले तरी उपांत्य फेरीच्या लढतीत आम्ही टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे मत आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज आॅरोन फिंच याने व्यक्त केले आहे़भारतीय गोलंदाज मोहंमद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव या तिकडीने वर्ल्डकपमध्ये आपला दबदबा राखताना ७० पैकी ४२ विकेट्स मिळविल्या आहेत.त्यामुळे उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियन फलंदाज भारताच्या वेगवान माऱ्याचा सामना कसा करतात याची सर्वांना उत्सुकता आहे़ फिंच म्हणाला, ‘‘भारतीय गोलंदाजांनी वर्ल्डकपमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे यात शंका नाही; मात्र उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियन फलंदाज या गोलंदाजांची गोलंदाजी निष्प्रभ ठरवतील, अशी आशा आहे़’’ फिंचने मान्य केले, की भारतीय संघात आऱ आश्विन आणि रवींद्र जडेजाही वर्ल्डकपमध्ये प्रभावी ठरले आहेत; मात्र त्यांच्याविरुद्धही आम्ही योजना आखली आहे़ त्यानुसार आम्ही या गोलंदाजांची गोलंदाजी यशस्वीरीत्या खेळून काढू़ भारतीय फलंदाजही सध्या फॉर्ममध्ये आहेत़ असे असले तरी आम्ही भारतीय फलंदाजांचे कच्चे दुवे शोधले आहेत़
भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज : फिंच
By admin | Published: March 25, 2015 1:18 AM