जयपूर : बीसीसीआयमध्ये गेल्या काही दशकांपासून घोटाळासत्र सुरूच आहे. अनेकांनी यात हात धुतले. काही जण गब्बर बनले. घोटाळा संपविण्यासाठी लोढा समितीच्या शिफारशींचा अंमल ५० वर्षांआधीच लागू व्हायला हवा होता, असे मत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी नोंदविले आहे.एकाकार्यक्रमात बोलताना बेदी म्हणाले, ‘‘क्रिकेट प्रशासनातील सुधारणा ५० वर्षांआधीच लागू व्हायला हव्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा पॅनलने समयसूचकता दाखवित प्रामाणिकपणे क्रिकेट प्रशासनाला वठणीवर आणले.’’बोर्डाच्या संचालनासाठी संभाव्य समितीमध्ये बेदी यांना स्थान मिळण्याची चर्चा आहे. ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे ही बीसीसीआयची जबाबदारी आहे. लोढा समितीच्या शिफारशीनुसार नव्याने कामकाज सुरू झाले असले तरी बीसीसीआय आणि राज्य संघटनांमधील पदांची लालसा बाळगणारे काही पदाधिकारी अद्यापही नव्या शिफारशी पचवायला तयार नाहीत. क्रिकेटमध्ये खुर्च्या भूषविण्यासाठी कट्टर विरोधक असलेले सर्वच पक्षाचे राजकीय नेते ताबडतोब एकत्र येतात.’’ (वृत्तसंस्था)
शिफारशी ५० वर्षांपूर्वीच लागू व्हायला हव्या होत्या : बेदी
By admin | Published: January 24, 2017 12:37 AM