- ललित झांबरे
नादिया कोमानेसी...हे नाव उच्चारताच आठवतो तो तिचा 'परफेक्ट टेन'चा विक्रम. या विक्रमाने तिला 'लिटल मिस परफेक्ट' अशी ओळख दिली. या लिटल मिस परफेक्टचा आज 12 नोव्हेंबर रोजी वाढदिवस.
जिम्नास्टिक्समध्ये पैकीच्या पैकी 10 गुण मिळवणारी ती पहिलीच खेळाडू. 1976 च्या माँट्रियाल अॉलिम्पिकमधील तिचा हा विक्रम बहुतेकांना माहितच आहे. या कामगिरीसाठी नादिया क्रीडा इतिहासात अजरामर ठरली असली तरी तिच्यानंतर नेली किम, स्वेतलाना बोगीनस्काया, डॅनियल सिलिवास, येलेना शुशूनोव्हा, मेरी लू रेटन आणि आणखी काही खेळाडूंनीसुध्दा 'परफेक्ट टेन'ची कामगिरी केलीय. त्यामुळे नादिया परफेक्ट टेन करणारी पहिली असली तरी 'युनिक' मात्र राहिलेली नाही. दुस-या एका विक्रमाबाबत मात्र नादिया नेहमीच 'युनिक' राहणार आहे आणि तिचा हा विक्रम बहुतेकांना माहित सुध्दा नाही. एवढेच नाही तर तिचा हा विक्रम कायम अबाधित राहणारा आहे. तो कधीच मोडला जाणार नाही.
हा विक्रम म्हणजे... अॉलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयाची जिम्नास्टिक्स सुवर्णपदक विजेती. 1976 च्या माँट्रीयाल अॉलिम्पिकमध्ये तिने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्यपदक जिंकले त्यावेळी तिचे वय होते अवघे 14 वर्षे.
हा 14 वर्षे वयात अॉलिम्पिक सुवर्णपदकाचा विक्रम आता कधीच मोडला जाणार नाही तो यासाठी की अॉलिम्पिक समितीने आता जिम्नास्टिक्समध्ये सहभागाची किमान वयोमर्यादाच आता 16 वर्षे केली आहे. म्हणजे 16 पेक्षा कमी वयात आता कुणी अॉलिम्पिक जिम्नास्टिक्समध्ये सहभागीच होऊ शकत नाही. त्यामुळे नादियाचा कमी वयाचा हा विक्रम आता कधीच मोडला जाणार नाही.
माँट्रियाल अॉलिम्पिकमधील नादियाच्या देदिप्यमान यशानंतर अतिशय कमी वयातच मुलांना जिम्नास्टिक्सकडे वळवण्याचे प्रकार सुरु झाले होते. त्यामुळे कोवळ्या वयातच मुलांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सुरुवातीला 1981 मध्ये जिम्नास्टिक्समध्ये सहभागाची किमान वयोमर्यादा 15 आणि 1997 मध्ये 16 वर्षे करण्यात आली. त्यामुळे नादियाचा 14 वर्षे वयात अॉलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम भविष्यात कुणी मोडेल याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्या आहेत.