ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात यावेत मागणी करणा-या याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञातत्र सादर करत आपली बाजू मांडली. आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे.
आरडब्ल्यूआयटीसीतर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा खेळपट्टींच्या वापरासाठी आम्हाला भरपूर होईल, यामुळे पिण्यायोग्य पाणी न वापरता पाणीप्रश्नाचा सामना करणं सोपं जाईल अशी बाजू एमसीएने मांडली आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएलच्या होणा-या 17 सामन्यांमध्ये पुनर्प्रक्रिया करण्यात आलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यात येईल अशी माहिती बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
तसंच किंग्ज इलेव्हन पंजाब आपले 3 सामने जे नागपूरमध्ये खेळण्यात येणार आहेत ते मोहालीला हलवण्यास तयार असल्याचंही वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी आरडब्ल्यूआयटीसीला विनंती करत महालक्ष्मी रेस कोर्सवर असणा-या सांडपाणी प्रक्रिया प्लांटमधील पाणीपुरवठा आयपीएल सामन्यांसाठी करण्याची विनंती केली होती. आरडब्ल्यूआयटीसीतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धां संपल्या आहे.पाण्याचा वापर ते रेसट्रॅकची देखभाल करण्यासाठी वापरतात. पवारांनी केलेली विनंती आरडब्ल्यूआयटीसीने स्विकारली आहे त्यामुळे एमसीएला दिलासा मिळाला आहे.