ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - फुटबॉलसारखे आता क्रिकेटच्या खेळातही रेड कार्ड वापरता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्यातील बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अधिकार पंचांना मिळणार आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2017पासून हा नियम लागू केला जाणार असल्याची माहिती मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC)नं दिली आहे. डिसेंबरमध्ये पार पडलेल्या एमसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत क्रिकेटच्या सुधारित नियमांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसारच 1 ऑक्टोबर 2017पासून ते लागू करण्यात येणार आहेत. क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्तीला आवर घालण्याची हीच योग्य वेळ असल्याची माहिती एमसीसीच्या क्रिकेट समितीचे मुख्य जॉन स्टीफनसन यांनी दिली आहे. खेळाडूंच्या बेशिस्तीच्या वागणुकीला कंटाळून अनेक पंच खेळापासून दुरावले आहेत, असं स्टीफनसन यांनी सांगितलं आहे. त्यामुळं क्रिकेटच्या मैदानातल्या बेशिस्तीला लगाम लावण्यासाठी आता हा रेड कार्डचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.या नियमांमुळे मैदानावरील खेळाडूंच्या वर्तणुकीला शिस्त लागेल, असा विश्वास जॉन स्टीफनसन यांनी व्यक्त केला आहे. एमसीसीनुसार बॅट आणि बॉलच्या बरोबरीचा विचार करून बॅटच्या आकारवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच फलंदाजानं धावसंख्या उभारताना पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट लावल्यानंतर पुन्हा बॅट उचलल्यानंतर बेल्स पडली तरी त्याला बाद म्हणून घोषित करता येणार नाही.
फुटबॉलसारखे क्रिकेटमध्येही आता रेड कार्ड !
By admin | Published: March 07, 2017 9:15 PM