धरमशाला : भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने सराव सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला भारतीय संघ जास्त महत्त्व देणार नाही, असे म्हटले आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी या संघाला पराभूत करणे मोठे आव्हान असेल आणि त्यांचा संघ प्रत्येक स्वरूपाच्या लढतीत सातत्याने चांगली कामगिरी करीत असल्याचेही रोहितने म्हटले.रोहित म्हणाला, ‘‘हा सराव सामना होता. त्यांनी आपला सर्वोत्तम संघ उतरवला तसेच राखीव खेळाडूंनाही अजमावले. मी त्या सामन्याविषयी जास्त विचार करू इच्छित नाही. प्रत्येक संघ सराव सामन्यात काही प्रयोग करीत असतो. त्यामुळे त्याकडे जास्त गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. दक्षिण आफ्रिका फक्त टी-२०मध्येच नाही, तर क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात सर्वांत तुल्यबळ संघांपैकी एक आहे.’’भारत जास्त टी-२०चे सामने खेळत नाही, याविषयी रोहितला छेडले असता तो म्हणाला, ‘‘आम्ही एक संघ म्हणून जास्त टी-२० सामने खेळले नाहीत; परंतु अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले. आम्ही आयपीएलमधील अनुभवाचा उपयोग करू. या स्वरूपात एक संघ म्हणून खेळणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल.’’ रोहितने आपला फोकस टी-२० वर्ल्डकपवर असल्याचेही सांगितले. वर्ल्डकप स्पर्धा ५ महिन्यांनंतर होत आहे. तो म्हणाला, ‘‘वर्ल्डकप स्पर्धा जवळ आली आहे आणि आम्हा सर्वांनाच टी-२० सामन्यात खेळण्याच्या संधीचा फायदा घ्यायला हवा. दक्षिण आफ्रिकेने जास्त टी-२० सामने खेळले नाहीत; त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील हे आव्हानात्मक असेल.’’दक्षिण आफ्रिकेचा टी-२० कर्णधार फाफ डू प्लेसिस याने पहिला सामना वेगवान खेळपट्टीवर घेण्याविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. पाहुण्या संघाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत काय तयारी करीत आहे, याविषयी विचारले असता रोहितने संघाचा फोकस हा फिरकी आणि वेगवान गोलंदाजी या दोन्हींवर असल्याचे सांगितले.तो म्हणाला, ‘‘त्यांच्याजवळ चांगले वेगवान गोलंदाजच नाही, तर प्रभावी फिरकी गोलंदाजही आहेत. सर्व पैलूंवर फोकस करणे योग्य ठरेल.’’ (वृत्तसंस्था)
पराभवाला जास्त महत्त्व नाही : रोहित
By admin | Published: September 30, 2015 11:46 PM