बीजिंग : जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीत बोलबाला राहिला तो बलाढ्य जमैकाचा. प्रथम महिला आणि नंतर पुरुष संघाने सुवर्ण पदक काबीज करून जमैकाने एकहाती दबदबा राखला. विशेष म्हणजे या सांघिक सुवर्णपदकासह जमैकाचा ‘वेगाचा बादशाह’ उसेन बोल्ट याने स्पर्धेत तीन, तर स्पर्धा इतिहासातील तब्बल ११ वे सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम केला. त्याचवेळी पुरुषांच्या ५ हजार मीटरच्या शर्यतीमध्ये ग्रेट ब्रिटनचा विक्रमवीर मोहम्मद फराह याने अपेक्षेनुसार सुवर्णपदकावर नाव कोरले. हे त्याचे ५ हजार मीटरमधील सलग तिसरे जागतिक विजेतेपद ठरले. पुरुषांच्या लढतीत जमैकाच्या बलाढ्य चौकडीने कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिका संघ बाद झाल्याचा फायदा घेत सहज बाजी मारली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उसेन बोल्टने अपेक्षित कामगिरी करताना विजयी कामगिरीचा धडाका कायम राखला. जमैकाने ३७.३६ अशी जबरदस्त वेळ देत जागतिक विक्रम रचला. विशेष म्हणजे या वेळी चीनने रौप्य व कॅनडाच्या चौकडीने कास्यपदकावर कब्जा केला. महिलांच्या रिले शर्यतीमध्ये वेरोनिका कॅम्बेल - ब्राऊन, नताशा मॉरिसन, एलेन थॉमसन आणि शेली-अॅन फ्रेझर - प्रीस यांच्या चमूने ४१.०७ सेकंदाची वेळ देत वर्चस्व राखले. सुरुवातीला पिछाडीवर राहिलेल्या जमैकाच्या धावपटूंनी नंतर आघाडी घेत बाजी मारली. अखेरच्या टप्प्यामध्ये शेली-अॅन हिने जबरदस्त वेगासह मोठी आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकले. अमेरिका आणि त्रिनिनाद - टोबॅगो या संघांनी अनुक्रमे ४१.६८ सेकंद व ४२.०३ सेकंद या वेळेसह रौप्य आणि कास्यपदक पटकावले.भारताच्या पदरी निराशाच...जागतिक अजिंक्यपद अॅथलेटीक्स स्पर्धा अंतिम टप्प्यात असून अजूनही भारताची पदकांची झोळी रिकामी आहे. महिलांच्या ४ ७ ४०० रिले स्पर्धेत भारतीय संघ हिटमध्येच बाहेर पडला. तर पुरुषांच्या ५० मीटर चालण्याच्या स्पर्धेत देखील भारतीयांची कामगिरी निराशाजनकच राहिली. त्याचवेळी थाळीफेकीच्या अंतिम फेरीत भारताचे आशास्थान असलेला विकास गौडा नवव्या स्थानी राहिला.अंतिम फेरीत विकासची कामगिरी पात्रता फेरीपेक्षाही खालावली. पात्रता फेरीमध्ये त्याने ६३.८६ मीटरची फेक करुन अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत त्याची फेक ६२.२४ अशी मर्यादित राहिली. पहिल्या प्रयत्नात ६०.२८ मीटरची फेक केल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात ६२.२४ मीटरची फेक केली. पोलंडच्या पायोत्र मलाचोक्सी याने ६७.४० मीटरची जबरदस्त फेक करुन सुवर्ण निश्चित केले. पुरुषांच्या ५० किमी चालण्याच्या स्पर्धेत संदीप कुमार आनि मनीष सिंग रावत यांना अनुक्रमे २६ व २७व्या स्थानी समाधान मानावे लागले.
रिलेत जमैकाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2015 2:37 AM