मुंबई : भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाचे शानदार शतक आणि त्याने कर्णधार चेतेश्वर पुजारासोबत केलेली नाबाद द्विशतकी भागीदारीमुळे शेष भारत संघाने इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत गुजरातला दमदार प्रत्युत्तर दिले आहे.रणजी चॅम्पियन गुजरातने दिलेल्या ३७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारत संघांने पहिल्या चार विकेट ६३ धावांत गमवाले होते. त्यानंतर पुजारा (८३*) आणि साहा (१२३*) यांनी जबाबदारीने फलंदाजी करीत संघाची धावसंख्या ४ बाद २६६ वर नेवून ठेवली. दोघांनी २0३ धावांची भागीदारी केल्याने विजयी लक्ष्य आता ११३ धावांवर आहे. गुजरातने सकाळी आपला डाव आठ बाद २२७ वरुन पुढे सुरु केला, परंतु त्यांनी १९ धावांत उर्वरीत दोन बळी गमावले.विजयासाठी ३७९ धावांचे मुश्किल आव्हान मिळालेल्या शेष भारत संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अखिल हेरवाडकर (२0) आणि अभिनव मुकुंद (१९) हे दोघे चांगली सलामी देण्यास अपयशी ठरले. इंग्लंडविरुध्द त्रिशतक करणारा करुण नायर (७) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्रिशतकानंतरच्या चार डावात त्याने पन्नाशीही पार केलेली नाही. मनोज तिवारीही ७ धावांवर बाद झाल्याने शेष भारतचा डाव ४ बाद ६३ असा अडचणीत आला. यानंतर मैदानात पुजारा आणि साहा यांची जोडी जमली. साहा तर पहिल्या चेंडूपासून आक्रमक होता. त्याने सलग दोन चौकाराने आपले खाते खोलले. त्यानंतर हार्दिक पटेलला षटकारही ठोकला. साहाचा मूड ओळखून दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्याची भूमिका घेतली. साहाने गजाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. प्रथम श्रेणीमध्ये हे त्याचे अकरावे शतक आहे. साहाने २१४ चेंडूचा सामना करताना १९ चेंडू सीमापार केले आहेत. संक्षिप्त धावफलक-गुजरात पहिला डाव : १0२.५ षटकात सर्वबाद ३५८ धावा (चिराग गांधी १६९, मनप्रीत जुनेजा ४७; सिध्दार्थ कौल ५/८६, पंकज सिंग ४/१0४).शेष भारत पहिला डाव : ७५ षटकांत सर्वबाद २२६ धावा. (अखिल हेरवाडकर ४८, चेतेश्वर पुजारा ८६; चिंतन गजा ४/६0, हार्दिक पटेल ३/७९.)गुजरात दुसरा डाव : ९0.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा. (प्रियांक पांचाळ ७३, चिराग गांधी नाबाद ५५; नदिम ४/६४, सिध्दार्थ कौल ३/ ७0)शेष भारत दुसरा डाव : ८४ षटकांत ४ बाद २६६ धावा. (वृद्धिमान साहा १२३*, चेतेश्वर पुजारा ८३*; हार्दिक पटेल २/५९)
शेष भारतचे दमदार प्रत्युत्तर
By admin | Published: January 24, 2017 12:32 AM