पर्थ : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज अनुभवाला मिळणार आहे. या मालिकेत जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे. पाच वन-डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. आॅस्ट्रेलियाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला तर भारताला कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करताना विशेष अडचण भासली नाही. रोहित म्हणाला, ‘‘आम्ही प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत. उभय संघ विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील.’’दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहज विजयाची नोंद केल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ताळमेळ जुळवताना अडचण भासणार नाही, असेही रोहित म्हणाला. रोहितने यापूर्वीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, की आम्ही यापूर्वी २०१४ मध्ये येथे मालिका खेळलो होतो. ती मालिका चुरशीची झाली होती. निकाल आमच्यासाठी अनुकूल नव्हता, पण आम्ही अखेरपर्यंत संघर्षपूर्ण खेळ केला होता. आम्ही त्या वेळी सकारात्मक खेळ केला होता, या वेळीही तसाच प्रयत्न राहील.सन २००८मध्ये सर्वप्रथम आॅस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या रोहितने त्यानंतर दोनदा आॅस्ट्रेलिया दौरा केला. गेल्या वेळी २०१५मध्ये वन-डे विश्वकप स्पर्धेच्या निमित्ताने रोहित आॅस्ट्रेलियात होता. भारतीय संघ मालिका सुरू होण्यास विलंब असताना आॅस्ट्रेलियात डेरेदाखल झाला आहे. रोहित म्हणाला, ‘‘पहिल्या वन-डे लढतीच्या तयारीसाठी जवळजवळ आठवडाभराचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी येथे खेळण्याचा अनुभव असल्यामुळे पर्थमधील वातावरणाची आम्हाला चांगली कल्पना आहे. (वृत्तसंस्था)
जशास तसे उत्तर देण्यास सज्ज : रोहित
By admin | Published: January 09, 2016 3:27 AM