नवी दिल्ली : १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ५७२ खेळाडूंसह ८00 पेक्षा जास्त सदस्यांचा पथक पाठवला आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडू व पदाधिकाºयांनी मैदान आणि त्याबाहेर जबाबदारीने वागावे, असेही केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणाºया पथकासाठी आयोजित सोहळ्यात राठोड म्हणाले, ‘‘तुम्ही खेळाडू या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात, ही गौरवाची बाब आहे आणि तुम्ही हा सन्मान मिळवला आहे, जेव्हा तुम्ही स्पर्धेत सहभागी व्हाल तेव्हा क्रीडाग्रामात राहाल, त्या वेळेस तुमची वैयक्तिक ओळख असणार नाही आणि फक्त तुमची ओळख ही ‘भारत’ या नावाने असेल. ही तुमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मैदान व बाहेर जे काही कराल तेव्हा अरबो लोकांच्या देशाचे तुम्ही प्रतिनिधित्व करीत आहात. ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही खेळाडू असा अथवा पदाधिकारी ही बाब प्रत्येक वेळी स्मरणात ठेवायला हवी.’’ याप्रसंगी आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, महासचिव राजीव मेहता, भारतीय पथकाचे प्रमुख ब्रिजभूषणसिंह उपस्थित होते. याप्रसंगी अव्वल खेळाडू हॉकी स्टार सरदारसिंह उपस्थित होते.याआधीच्या तुलनेत या वेळेस भारत जास्त पदके जिंकेल, अशी आशा आहे; परंतु खेळाडूंनी निकालाचा जास्त विचार करू नये, असेही राठोड यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही इतक्या वर्षांपासून तयारी करीत आहात आणि पदक जिंकणे हे तुमचे स्वप्न असेल. हजारो तास केलेली ट्रेनिंग आणि कठोर मेहनत तुम्हाला मदत करील. स्वत:वर विश्वास ठेवा असा मी तुम्हाला सल्ला देईल. कृपया निकालाविषयी जास्त चिंता करू नका आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. मी भारतीय खेळाडूंचा उत्साह आणि दृढनिश्चय पाहिला आहे. त्यात १९९0 च्या दशकाच्या तुलनेत १५ वर्षांचा असो अथवा ४0 वर्षांचा खेळाडू यात खूप जास्त बदल झाला आहे. मी या खेळाडूंना तयार करण्यासाठी आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे अभिनंदन करतो. आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन काम करावे लागेल. कोणीही एकटा काम करू शकत नाही. हे भारतीय खेळासाठी चांगले आहे.’’ (वृत्तसंस्था)>पत्रकारांशी बोलताना राठोड म्हणाले की, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणे हे आयओए आणि एनएसएफचा विशेष अधिकार असून मंत्रालय यात हस्तक्षेप करू इच्छित नाही.’ते म्हणाले, ‘आशियाई स्पर्धा निवड प्रक्रियेची जबाबदारी आम्ही आयओए व एनएसएफवर दिली. यात जास्त लोकांचा सहभाग नसणे योग्य ठरेल. त्यामुळे निवडीची जबाबदारी ही आयओएवर असेल; परंतु जर यात थोडीही विसंगती आढल्यास आम्ही नक्की लक्ष घालू.’
स्पर्धेदरम्यान जबाबदारीने वागा - राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:06 AM