नवी दिल्ली : मोहाली येथे होणाऱ्या निवडणुकीच्या एक दिवस आधी क्रीडा मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेला (एनआरएआय) नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले श्यामसिंग यादव यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर परस्पर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने हे निर्देश दिले.
क्रीडा मंत्रालयाने नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले असले, तरी एनआरएआय शनिवारी निवडणूक पार पाडणार आहे. कारण, हा निवडणूक अधिकारी नियुक्तीचा मुद्दा दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबर महिन्यात होणार आहे. विद्यमान अध्यक्ष रनिंदर सिंग पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी लढणार असून, त्यांना श्यामसिंग यादव यांनी आव्हान दिले आहे.
- मंत्रालयाच्या निर्देशानंतर ही निवडणूक अवैध ठरविण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. उत्तर प्रदेश राज्य रायफल संघटनेचे अध्यक्ष असलेल्या यादव यांच्या याचिकेवर कारवाई करताना क्रीडा मंत्रालयाने निवडणूक अधिकारी बदलण्यास सांगितले होते. क्रीडा मंत्रालयाने आदेश दिले की, राष्ट्रीय क्रीडा संहिता २०११चे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष देताना निवडणूक अधिकारी बदलावा. निवृत्त न्या. मेहताबसिंग गिल यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांच्या नियुक्तीवर यादव यांनी आक्षेप घेतला आहे.