माद्रीद : फ्रान्सचे माजी क्रीडामंत्री यांनी टेनिसपटू राफेल नदाल याच्यावर लावलेल्या अयशस्वी आरोपानंतर नदालने उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीचे निकाल हे सार्वजनिक व्हावेत, असे पत्र आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघटनेला पाठविले आहे. १४ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या नदालने आपल्या कारकिर्दीतील सर्व निकाल सार्वजिक करण्याचा आग्रह धरला आहे.
क्रीडामंत्री रॉसलीनने नदालवर ड्रग्स चाचणीचे निकाल लपविल्याचा आरोप लावला होता. यावर नदालने रॉसलीनवर खटला दाखल केला होता. आता त्याने आयटीएफचे अध्यक्ष डेव्हिड हॅगर्टी यांना लेखी पत्र पाठविले आहे. यात टेनिस हा आंतरराष्ट्रीय आणि लोकप्रिय खेळ असून या खेळात पारदर्शकता आणि प्रामाणिकता असणे गरजेचे आहे.
स्वायत्त संस्थांवर आता अधिक चांगले काम करण्याची वेळ आली आहे. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलायला हवीत, असेही नदालने म्हटले आहे. माझ्या आतापर्यंतच्या चाचणी सार्वजनिक व्हाव्यात. ज्यामुळे विश्वसनीयता टिकून राहील. आपल्या चाहत्या खेळाडूबाबत खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. जर एखाद्या खेळाडूविरुद्ध खोटे आरोप लावले जात असतील तर त्या व्यक्तीविरुद्ध खटला दाखल करायलाच हवा, असे नदालने म्हटले आहे.