चेन्नई : स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या वृत्ताचा ज्येष्ठ खेळाडू लियांडर पेस याने इन्कार केला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे स्टार टेनिसपटूचे मत आहे. नव्या जोडीदाराला पहिला ग्रॅन्डस्लॅम जिंकण्यासाठी प्रेरित करायचे असल्याने पुढील वर्षी चन्नई ओपन चषक जिंकण्याचे लक्ष्य राहील, असे त्याने सांगितले.पेस आणि ब्राझीलचा आंद्रे सा यांची २०१७ या नववर्षाची सुरुवात पराभवाने झाली. बुधवारी रात्री दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात या जोडीला पुरब राजा-दिविज शरण या भारतीय जोडीकडून पराभवाचा धक्का बसला. आतापर्यंत देशचा सर्वांत यशस्वी टेनिसपटू राहिलेल्या पेसला ही अखेरची चेन्नई ओपन आहे का, असा प्रश्न करण्यात आला. यावर पेस म्हणाला, ‘ माझा प्रयत्न पुढल्या वर्षी चषक जिंकण्याचा आहे. ’पेसने सहावेळा चेन्नई ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकविले आहे. त्यातील पाचवेळा महेश भूपतीसोबत जेतेपद मिळविले हे विशेष. २०१२ मध्ये पेसने सर्बियाचा यांको टिपसारेविचसोबत जेतेपदाचा मान मिळविला होता. पेस पुढे म्हणाला, ‘सोमदेवने निवृत्ती जाहीर केली तेव्हा घोळ झाला. मी देखील आज उद्या किंवा सहा महिन्यांनी निवृत्त होऊ शकतो. त्यावर अचनाक वृत्त आले की, ‘लियांडर पेस निवृत्त होणार!’
निवृत्तीबाबतच्या वृत्ताचे लियांडर पेसकडून खंडन
By admin | Published: January 06, 2017 1:10 AM