लंडन : इंग्लंडचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज इयान बेल याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तथापि, कसोटी क्रिकेट खेळण्याची भूक अद्यापही बाकी असल्याचे त्याने म्हटले आहे.३३ वर्षीय बेलने आॅस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेज मालिका जिंकल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते; परंतु संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस आणि कर्णधार अॅलेस्टर कुक यांच्याशी चर्चा केल्यानंतर बेलने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.बेल म्हणाला, ‘‘अॅशेज एक महत्त्वपूर्ण मालिका आहे आणि प्रत्येक अॅशेज मालिका संपल्यानंतर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवतो. मी ओव्हल कसोटीनंतर प्रशिक्षक बेलिस आणि कर्णधार अॅलेस्टर कुक यांच्याशी या संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली होती. मी माझा विचार त्यांच्यासमोर प्रामाणिकपणे ठेवला होता. निवृत्ती घेण्याचा एक खूपच कठीण निर्णय होता. मी याविषयी खोलवर विचार केला. माझ्यात अद्यापही धावा करण्याची भूक आहे आणि मला वाटते मी अजूनही कसोटी क्रिकेट खेळ सुरू ठेवू शकतो.’’मधल्या फळीतील या विश्वसनीय फलंदाजाने इंग्लंडकडून वन डेत सर्वात जास्त धावा केल्या आहेत. त्याने १६१ वन डेत चार शतकांसह ५ हजार ४१६ धावा केल्या आहेत. याशिवाय ११५ कसोटी सामने खेळताना २२ शतकांसह जवळपास ४३ च्या सरासरीने ७ हजार ५६९ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून फक्त चार फलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)
बेलची वन डेतून निवृत्ती
By admin | Published: August 30, 2015 2:35 AM