ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २६ -वर्ल्डकपमधील सेमी फायनलमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय सामन्यांमधील निवृत्तीच्या प्रश्नाची खिल्ली उडवली. निवृत्ती घेण्यासाठी मी अजून म्हातारा झालेलो नसलो तरी माझे भविष्य आता तुम्हीच ठरवा असा टोला धोनीने प्रसार माध्यमांना लगावला.
सेमी फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्रकार परिषद घेतली. यात धोनीने पराभवाचे विश्लेषण केले. भारताचे वेगवान गोलंदाजांनी अपेक्षीत कामगिरी न केल्याने व शिखर धवनने निष्काळजीपणे मारलेला फटका या दोन चुकांमुळे पराभव झाल्याची कबुली त्याने दिली. आज फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण वेगवान गोलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलिया ३५० पेक्षा जास्त धावा करेल अशी स्थिती होती. पण आम्ही त्यांना ३२८ धावांवर रोखण्यात यशस्वी झालो. आमचे गोलंदाज यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करु शकले असते असे धोनीने स्पष्ट केले.
निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी म्हणतो, मी आत्ता ३३ वर्षांचा आहे. पुढील वर्षी टी -२० वर्ल्डकप होणार असून त्यानंतर निवृत्तीच्या निर्णयावर विचार करीन. माझा फिटनेस, मी दिलेले संकेत या आधारे आता तुम्हीच माझे भविष्य ठरवा असे हसतमुखाने सांगत धोनीने प्रसारमाध्यमांना टोला लगावला.