ख्राईस्टचर्च : आॅस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने मंगळवारी जाहीर केले. मॅक्युलम १२ फेब्रुवारी रोजी आपल्या कारकिर्दीतील विक्रमी सलग १००वा कसोटी सामना खेळणार आहे. २० फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो निवृत्ती स्वीकारणार आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल मानांकन असलेला केन विल्यम्सन ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. गेल्या वर्षी भारताविरुद्ध त्रिशतकी खेळी करणारा मॅक्युलम व आॅस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. मॅक्युलमने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९१ षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला आहे. मॅक्युलम पुढे म्हणाला, ‘‘सध्या माझे लक्ष आगामी काही आठवड्यांमध्ये चमकदार कामगिरी करून संघाच्या विजयात योगदान देण्यावर केंद्रित झाले आहे.’’आॅस्ट्रेलियाविरुद्ध २००२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मॅक्युलमला पहिला कसोटी सामना दोन वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आहे. कर्णधार म्हणून २०१३मध्ये त्याला पहिल्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. इंडियन प्रिमीअर लीगसोबतही त्याचे प्रदीर्घ कालावधीपासून नाते आहे. त्याने कोच्ची टस्कर्स केरळ आणि चेन्नई सुपरकिंग्स संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे. काही दिवसांपुर्वीच ख्रिस केर्न्सविरुद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात ब्रेंडन मॅक्युलमने साक्षीदार म्हणून हजेरी लावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर निवृत्ती स्वीकारण्याच्या निर्णयाचे दु:ख वाटत नसल्याचे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था) ९९ कसोटी सामन्यांत ११ शतकांसह एकूण ६,२७३ धावा फटकावल्या. त्याने २५४ वन-डे सामने खेळताना ५ शतकी खेळींसह ५,९०९ धावा केल्या आहेत. ५२ कसोटी सामन्यांत यष्टिरक्षण करणाऱ्या मॅक्युलमने १९४ झेल टिपले. त्याच्याकडे २०१२मध्ये संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २००८ ते २०१० आणि त्यानंतर २०१२ -२०१३मध्ये कोलकाता नाईट रायडर्सतर्फे खेळला. मॅक्युलमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने ३१ कसोटी सामने खेळले. त्यांपैकी ११ सामन्यांत विजय मिळविला, तर ११ सामने अनिर्णीत संपले. वन-डे क्रिकेटमध्ये मॅक्युलमची सरासरी ५९.४३ आहे. न्यूझीलंडतर्फे हा विक्रम आहे.मी ख्राईस्टचर्च कसोटीपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करायला पाहिजे होता; पण टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी लवकरच संघाची निवड होणार असल्यामुळे चर्वितचर्वण थांबविण्यासाठी आत्ताच माझा निर्णय जाहीर केला. मला न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना व कर्णधारपद भूषवताना आनंद मिळाला; पण प्रत्येक बाबीचा शेवट असतोच.- ब्रेंडन मॅक्युलम
मॅक्युलम घेणार निवृत्ती
By admin | Published: December 23, 2015 1:15 AM