बेनूर : (तिरुअनंतपुरम)- अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर शनिवारपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ होत आहे़ या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी काणाडोळा केला आहे; मात्र तरीही युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा चांगले व्यासपीठ आहे़ केरळमधील सात जिल्ह्यांत होत असलेल्या या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी खूप उशीर झाला़ त्यामुळे ही स्पर्धा निर्धारित कार्यक्रमाच्या तब्बल तीन वर्षांनंतर आयोजित करण्यात येत आहे़ या स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकरला सद्भावना दूत बनविण्यात आले; मात्र तरीही स्पर्धेसाठी पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही़ दरम्यान, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, आॅलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंह, मल्ल सुशीलकुमार, योगेश्वर दत्त यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे़ त्यामुळे स्पर्धेचे आकर्षण कमी झाले आहे़या वेळी स्पर्धेत एकूण १३६७ पदकांसाठी खेळाडू झुंजणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी अॅथलिट पी़ टी़ उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज यांची उपस्थिती राहणार आहे़ (वृत्तसंस्था)
दिग्गज खेळाडूंची माघार
By admin | Published: January 31, 2015 3:34 AM