ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भारतात क्रिकेटचं असलेल वेड याबद्दल नव्याने काही सांगायची गरज नाही आणि त्यातही सचिन तेंडूलकर म्हणजे सर्वांसाठी क्रिकेटमधला देवच. चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावर आधारित "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" चित्रपट आज रिलीज झाला आहे. सचिन तेंडूलकरबद्दल आजपर्यंत लोकांनी इतकं वाचलं, पाहिलं आहे की चित्रपटात काय वेगळं असेल असा प्रश्न पडतो. पण हा चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मेजवानी आहे. म्हणजे सचिन तेंडूलकर खेळपट्टीवर एकामागून एक जबरदस्त फटके मारतोय, आणि आपण फक्त त्याला पाहत राहावं असं काहीसं.
चित्रपटात सचिनचा बालपणापासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याच्या आयुष्यातील काही खासगी क्षण चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळतात. अर्जून, सारा आणि पत्नी अंजलीसोबत घालवलेले काही खास क्षणही पाहण्याची संधी मिळते. क्रिकेटच्या मैदानावरील सचिन आतापर्यंत आपण पाहिला आहे, पण मैदानाबाहेर खासगी आयुष्यात तो नेमका कसा आहे याचं दर्शनच चित्रपटातून घडतं. सचिनने चित्रपटात सुत्रधाराची भूमिका निभावली आहे. आपल्या प्रवासापासून ते मिळवलेले विजय, पराभव, दुखापत याबद्दल सचिन सांगताना दिसतो. तसंच आपल्याला माहित नसलेल्या अनेक गोष्टींचाही सचिनने उलगडा केला आहे.
1989 मध्ये सचिनने पाकिस्तानविरोधात खेळताना अब्दुल कादिरला लगावलेले ते चार सिक्स पाहताना मजा येते. आजपर्यंत युट्यूबवर अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, पण थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर पाहताना आपण आपोआप त्यात हरवून जातो. मग ती 1998 मध्ये चेन्नईत शेन वॉर्नला धुतलेली मॅच असो. सचिनने गाठलेली उंची इतकी मोठी आहे की ते सर्वच चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणं थोडं कठीणच आहे. मात्र तरीही शक्य तितक्या सर्व गोष्टी सामावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटात सचिनचे रेकॉर्ड्स, उपलब्धी दाखवण्यात आलेल्या असल्या तरी वाद टाळण्यात आले आहेत. मॅच फिक्सिंगसारख्या घटना टाळण्यात आल्या आहेत. काही सामन्यांमध्ये सचिनन केलेली खराब कामगिरी वैगरे गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. पण चाहते ही गोष्ट जास्त मनावर घेणार नाहीत. कारण भव्य दिव्य सचिनसमोर हे सर्व विसरायला होईल.
सचिनचे चाहते असाल तर एकदा तरी चित्रपट नक्की पाहा. तुम्हाला येणारा अनुभव असा शब्दांत सांगणं कठीणच. पण पैसा वसूल होईल एवढं मात्र नक्की.