बसवराज मठपती -
सोलापूर, दि. 02 - अत्यंत हलाखीची परिस्थिती, वडील रिक्षाचालक, आई मोलमजूर, भाऊ-बहिणींच्या शिक्षणाचा खर्चही न पेलवणारा अशा विषम परिस्थितीवर मात करीत नवनवीन विक्रम करण्याचा ध्यास बाळगणारा सोलापूरचा तरुण हौशी स्केटिंगपटू सैपन जब्बार बागवान याला आता वेध लागले आहे ते दोन नव्या विक्रमांचे. सैपनला दोन प्रकारचे नवे विक्रम प्रस्थापित करावयाचे आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॅकवर्ड स्केटिंग अर्थात उलट स्केटिंग करणे आणि दुसरे म्हणजे पाच दिवस अखंडितपणे स्केटिंग करणे हे त्याचे सध्याचे प्रमुख लक्ष्य आहे.
सैपनची घरची परिस्थिती खूपच नाजूक आहे. तो स्वतादेखील काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवतोय. सैपन सध्या बारावी बहिस्थ शिक्षण घेत आहे. स्केटिंगमध्ये सैपनने यापूर्वी अनेक विक्रम केले आहेत. सन २००८ मध्ये पुणे- सोलापूर या ३०७ किमीचे अंतर सलग १७ तास ३९ मि़ स्केटिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. या विक्रमाची नोंदही त्याने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी केली होती.
त्यानंतर ३० डिसेंबर २०१३ रोजी आणखी एक विक्रम केला होता. तो म्हणजे हर्डल जंपचा, साडेतीन फूट उंचीच्या हर्डलवरून सलगपणे न थांबता ३७ मि़ २४ सेकंदांत ५०० हर्ल्डल जंपचा विक्रम त्याने केला होता़ यावेळीही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद केली होती.
सैपनला आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद करण्याचे वेध लागले आहेत. यासाठी तो आपला सहकारी मितेश काळेसोबत नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात पाच ते सात तास स्केटिंगचा सराव करतोय़ या विक्रमासाठी ते दोघेही पाच-पाच तासांच्या टप्प्याने पाच दिवस सातत्याने स्केटिंग करणार आहेत.
सैपनची कामगिरी-
-32 वेळा जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग़
-राज्यस्तरीय स्पर्धेत २२ वेळा त्याने सहभाग नोंदविला़ यात तीन वेळा विजय नोंदविला आहे़ २००९, २०११ आणि २०१२ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला़
-राष्ट्रीय स्पर्धा: गोवा येथील राष्ट्रीय स्केटिंग रिंग बॉल स्पर्धेतही त्याने सहभाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय:
-नेपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग रिंग बॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कामगिरी केली आहे़ १२ जणांच्या राज्य संघाचा तो कर्णधार होता़
-थायलंड येथे सप्टेंबरमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंगबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून तीन जणांची निवड झाली आहे़ भारताकडून खुल्या गटातील स्पर्धेसाठी निवड झालेल्या १२ जणांच्या चमूमध्ये त्याचाही समावेश आहे़
-सैपनच्या विक्रमामध्ये आर्थिक परिस्थिती अडचण ठरतेय. या विक्रमासाठी त्याला ३० ते ३५ हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठी तो सध्या धडपडतोय़ याशिवाय नव्या विक्रमासाठी येणारा खर्च कसा भागवायचा यासाठी त्याने अनेकांकडे मदतीचा हात मागीतला आहे़
प्रेरणा अशी मिळाली
अरविंध धाम येथील स्केटिंग ट्रॅकवर तो स्केटिंगचा सराव करणाºया मुलांकडे बघत बसायचा़
-व्हील्स रोलर स्केटिंग क्लबच्या माध्यमातून प्रमुख दीपक घंटे यांच्यामार्फत त्याला मोफत प्रशिक्षणाची संधी मिळाली़ यानंतर तो या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्याने अनेकदा भरीव कामगिरी केली आहे.
-आई-वडिलांनीदेखील त्याचा स्केटिंगचा छंद भागविण्यासाठी भरपूर मदत केली आहे़ वडील जब्बार बागवान हे रिक्षाचालक आहेत. रिक्षा चालवून आपल्या मुलाची हौस भागवतात़ आई परवीन बागवान देखील मोलमजुरी करून कुटुंबीयांसह सैपनची हौस भागवतात़ भाऊ इम्रानचीदेखील त्याला याकामी भरपूर मदत मिळत असते.
स्केटिंगमधील कोणतेही विक्रम असोत सैपनसाठी अशक्य असे काहीच नाही़ आर्थिक परिस्थितीमुळे तो मागे पडत आहे़ आम्ही व्हील्स स्केटिंग क्लबच्या माध्यमातून त्याला मोफत प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित करीत आहोत़
-दीपक घंटे, अध्यक्ष, व्हील्स स्केटिंग क्लब़